यशस्वी जीवनाच्या मैदानातील हिंदकेसरी पैलवान- आमचं तात्या!

(गावातील सर्व लोक तात्यांना (श्री.गुलचंद तुका नांगरे) आदराने पैलवान म्हणतात म्हणून येथे पैलवान हा उल्लेख केला आहे)

बरेच दिवसापासून तात्यांविषयी (माझ्या आईचे वडील म्हणजे माझे आजोबा) लिहायचे म्हणत होतो. मुद्द्यांची जुळवाजुळव झाली होती. परंतु लिहिण्याची सुरुवात करण्यासाठी मुहूर्त सापडत नव्हता. पण आज तो मुहूर्त सापडला आणि तो मुहूर्त म्हणजे तात्या आणि आई (माझी आज्जी, आनंदीबाई नांगरे) यांच्या लग्नाचा वाढदिवस तोही 63 वा! 1 एप्रिल 1959 रोजी दोघांचा विवाह झाला. तात्या आणि आईच्या लग्नाची लग्नपत्रिका ही माझ्या मामांकडे आहे, त्यावरून लग्नाचा वाढदिवस अगदी बिनचूक सांगता आला. पूर्वीच्या लोकांच्या जन्मतारखांच माहित नव्हत्या मग लग्नाचा वाढदिवस माहित असण्याचे तर सोडाच आणि त्यावेळी असे लग्नाचे वाढदिवस, स्वतःचे वाढदिवस करण्याचे फॅड नव्हतेच मुळी!

शाळेत झेंडावंदन होते त्या दिवशी तुझा जन्म झाला. मग तो 26 जानेवारी, 15 ऑगस्ट की 1 मे, कारण या तीन दिवशी शाळेत झेंडावंदन होते. पण त्या दिवशी पाऊस पडत होता मग त्यावरून नक्कीच ऑगस्ट महिना असणार मग जन्म 15 ऑगस्टचा अशी माझ्या मामांची जन्मतारीख लक्षात ठेवणारे माझे आज्जी- आजोबा आपल्या लग्नाचा 63 वा वाढदिवस आज 1 एप्रिल 2022 रोजी साजरा करत आहेत. प्रथम दोघांना मनापासून लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आजच्या जमान्यात लग्न एक वर्षे टिकले तर आनंद गगनात मावेना, व्हाट्सअपवर मावेना, फेसबुकवर मावेना, इन्स्टावर मावेना...... या जमान्यात आपल्या मुलांसोबत, सूनांसोबत, नातसूनांसोबत, नातवांसोबत आणि परतुंडांसोबत लग्नाचा वाढदिवस साजरा करणे म्हणजे दुग्धशर्करा योगच आहे!

आई आणि तात्या यांचे लग्न इतके वर्ष का टिकले असेल असा ज्यावेळी मी विचार केला त्यावेळी माझ्या लक्षात आले ते म्हणजे एकमेकांना त्यांच्या आवडीनिवडीनुसार, सवयीनुसार, चांगल्या-वाईट गोष्टीनुसार, कधी प्रेमाने, कधी रागाने, कधी लाडाने, कधी सामंजस्याने, कधी खंबीरपणे, कधी खेळीमेळीने, कधी खुलेपणाने स्वीकारल्यामुळे ते टिकले आहे. पण मला यात कधीच तडजोड दिसली नाही. जे सध्या घडत आहे ते म्हणजे बरेचजण तडजोडीसाठी नवरा-बायको म्हणून रहात आहेत. त्यांना सर्वांना आई आणि तात्यांचे वैवाहिक जीवन म्हणजे एक आदर्श परिपाठ आहे आणि हे आई तात्यांचे वैवाहिक जीवन सध्याच्या काळात पीएचडीचा विषय होऊ शकतो याबद्दल दुमत नाही.

आई आणि तात्या या दोघांविषयी लिहिण्यासारखे बरेच आहे आणि एकाच लेखात दोघांविषयी लिहिले तर दोघांच्यावर अन्याय केल्यासारखे होईल. म्हणून आजच्या लेखात तात्यांविषयी लिहिणार आहे आणि पुढील लेखात आई विषयीच्या माझ्या भावना कागदावर उतरवणार आहे.

तात्यांविषयी लिहिण्याचे ठरवले तेव्हा तात्यांनी मला लहानपणापासून त्यांच्याविषयीच्या सांगितलेल्या गोष्टी आठवल्या आणि त्या प्रत्येक गोष्टीतून तात्यांच्या विषयी अनेक पैलू माझ्या नजरेसमोर येऊ लागले आणि तात्यांचे व्यक्तिमत्व माझ्या विचारात तयार झाले आणि ते उतरवण्यास मी सुरुवात केली.

तात्यांविषयी त्यांच्या मुलांना म्हणजेच माझ्या दोन्ही मामांना (श्री.दिनकर नांगरे, केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक, येलुर आणि श्री.जयकर नांगरे, माध्यमिक शिक्षक,कार्वे) आणि मुलीला (विजया काटे, गृहिणी) म्हणजेच माझ्या आईला विचारले असता त्यांनी सांगितलेल्या प्रसंग व घटना यांच्यापेक्षा अधिक माहिती नातवालाच म्हणजे मला(श्री दिपक काटे) माहीत असल्याचे लक्षात आले, असो! त्याचे कारण म्हणजे आजोबा आणि नातू एक घट्ट बंधन असते. आजोबा हा नातवांच्या जीवनातील पहिला मित्र तर नातू हा आजोबांच्या जीवनातील शेवटचा मित्र असतो त्यामुळे असेल कदाचित!

तात्यांना नातवांचा सहवास फार मोठा आहे. त्यांना सर्वच नातवांचा फार अभिमान आहे. एक नातू (दिपक काटे) महाराष्ट्र शासनामध्ये वर्ग 1 अधिकारी आहे, एक नातू (संदीप उर्फ अण्णा काटे) नवउद्योजक आहे, एक नातू (अनिकेत नांगरे) माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित कंपनीत अधिकारी आहे, एक नातू (अनिरुद्ध नांगरे) शासकीय कॉलेजमध्ये अभियांत्रिकी क्षेत्रात उच्च शिक्षण पूर्ण करत आहे, एक नातू (स्वरूप नांगरे) सध्या नवव्या इयत्तेत शिकत असून त्याचेही मोठ्या स्वप्नाच्या दिशेने मार्गक्रमण सुरू आहे तसेच एक नात (समीक्षा नांगरे) आता बारावीची परीक्षा देऊन उच्च शिक्षण घेऊन स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज झाली आहे. सर्व नातवंडांचे कोडकौतुक करणारे, नातवांना जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारे, नातवांना कोडी, कथा सांगून मनोरंजन करणारे, नातवांच्या बरोबर, परतुंडांच्या (अन्वयी काटे,कार्तिक काटे आणि ओजस काटे) बरोबर बोलण्याने भारावून जाणारे, वयाच्या 87 वर्षी मोबाईल वापरणारे, नातवांना आणि परतुडांना सेल्फी देणारे, आधुनिकतेशी नाळ जोडणारे, नातवांच्याकडून नवनवीन गोष्टी शिकण्यात रस घेणारे, रोजचा पेपर चाळून त्याबद्दल गप्पा मारणारे तात्या म्हणजे एक उत्तम मार्गदर्शक किंवा दिशादर्शकच आहेत.

नातू अधिकारी आहे म्हणून त्याला आवजाव बोलवणारे, शाळेची पायरी न चढलेल्या तात्यांचा विचार मी जेव्हा करतो. तेव्हा मला मी अधिकारी असताना यशदामध्ये (शासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी संस्था पुणे येथे आहे) ऑफिस मॅनर्स कसे असतात हे शिकविण्यात आले. तात्या शाळेत न जाता हे सर्व कसे शिकले असतील याचा प्रश्न पडतो.

तात्यांच्या वयाच्या 87 व्या वर्षीचा दिनक्रम म्हणजे ते सकाळी साडेपाच वाजता उठतात. फ्रेश होऊन चार-पाच मैल फिरून येतात. त्यानंतर आंघोळ करून न्याहारी करतात. शेतावर जाऊन येतात. दुपारी तासभर झोप घेतात. संध्याकाळी पुन्हा फिरून येऊन जेवण करून रात्री नऊ वाजता झोपतात. रात्री जेवणाच्या आधी तात्यांना कळत असल्यापासून ते थोड्या प्रमाणात न चुकता मद्य घेतात. दिवसातून चार ते पाच वेळा पान व तंबाखू खातात. नॉनव्हेज हा त्याचा वीक पॉईंट आहे.

तात्यांच्या दिनक्रमात ते दोन वेळा, योग्य आहार, तोही योग्य प्रमाणात, योग्य वेळी घेतात. रोज न चुकता सकाळ संध्याकाळ व्यायाम करतात. नेहमी प्रसन्न, सकारात्मक राहतात. त्यामुळे कित्येक वर्ष झाले तात्यांची तब्येत, वजन आहे तसेच आहे. त्यात बदल नाही. त्यामुळे आजपर्यंत तात्यांनी दवाखान्याची पायरी चढली नाही. आज आम्ही तब्येत चांगली राहण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, प्रसन्न राहण्यासाठी, सकारात्मक राहण्यासाठी, व्यसनावर नियंत्रण आणण्यासाठी, डॉक्टर कडे जातो. त्यांचे सल्ले घेतो, पुस्तके वाचतो आणि हो आम्ही सर्व जण उच्चशिक्षित आहोत! शाळेची पायरी न चढलेल्या पैलवान आजच्या युगातील जगन्नाथ दीक्षित, ऋतुजा दिवेकर यांच्या सारख्या आहार तज्ञांसाठी सुद्धा अभ्यासाचा विषय आहे. किंबहुना वरील गोष्टीवर पुस्तक न दिलेला हा आहार तज्ञच आहेत. तसेच मनावर नियंत्रण ठेवायला शिकवणारे योग गुरू आहेत. लवकर निजे लवकर उठे त्यास सुख, शांती, समृद्धी लाभे, असे आपल्याकडे म्हटले जाते ते कित्येक दशके पाळणारे, ती सवय अंगी बानवणारे आमचे तात्या फिटनेस गुरुच आहेत!

कोषा पटका म्हणजे तात्या, पांढराशुभ्र सदरा म्हणजे तात्या, लहान मुलांसारखे गाल म्हणजे तात्या, मिशावर ताव मारणारे तात्या बटवा, अडकित्ता, पान, सुपारी म्हणजे तात्या, या सर्वांचं एकत्रित भारदस्त व्यक्तिमत्व म्हणजे आमचं तात्या! सध्याच्या युगात त्यांचा पेहराव म्हणजे एक फॅशन ब्रँडच आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

मुलांच्या शिक्षणासाठी घरातील भांडी विकून 60 वर्षांपूर्वी शिक्षणाची महती ओळखण्याची दूरदृष्टी असणारे, सायकलवरून 25 ते 30 किलोमीटर शिक्षण घेणाऱ्या मुलाला डबा पोचवणारे, मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळावे म्हणून शिक्षक मित्र जोडणारे, 50 वर्षापूर्वी मुलीलाही सहावीपर्यंत शिक्षण देणारे, म्हणजेच मुलगी शिकली प्रगती झाली ही सध्याची शासनाची मोहीम 50 वर्षापूर्वी राबवणारे, मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी संकटाची पर्वा न करणारे आमचं तात्या! म्हणूनच तात्यांना, पुरोगामी विचारसरणीचे व्यक्तिमत्व, शिक्षणतज्ञ, काळाची पावले ओळखणारे समाजसुधारक म्हटल्यास ते योग्यच ठरेल!

आयुष्यात माणसाला योग्य दिशा देण्यासाठी, यश मिळवण्यासाठी, एका गुरुची आवश्यकता असते. तात्यांचा देखिल एक गुरु होते. त्या गुरूने जीवनात सांगितलेल्या गोष्टी तात्या आवर्जून सांगतात. त्यानुसार मार्गक्रमण केल्याचे दाखलेही देतात. म्हणजे तात्या हे स्वतःच्या अनुभवावर मोठे झालेले उच्चशिक्षित व्यक्तिमत्व आहे. फक्त त्यांना आमच्यासारखी कागदावर शिक्का असलेली तथाकथित डिग्रीची कागदपत्रे नाहीत. डिग्रीची कागदपत्रे नसलेले तात्या आडाणी उच्चशिक्षित आहेत आणि आम्ही डिग्रीची कागदपत्रे असलेले उच्चशिक्षित अडाणी आहोत असे माझे ठाम मत आहे.

आजच्या युगात आस्तिक व नास्तिक हा वाद सुरू असताना, दर शनिवारी ग्रामदैवत असणाऱ्या हनुमान मंदिरात न चुकता जाणारे पण कर्मकांडात न अडकलेल्या तात्यांना आस्तिक म्हणावे की नास्तिक याबद्दल संभ्रम आहे. मला वाटते ते वास्तविक आहेत, असेच म्हणावे लागेल.

छप्परापासून दोन-दोन बंगल्यापर्यंत, सायकलपासून दोन-दोन चारचाकी वाहनांपर्यंत, घरात शिक्षणाचा गंधही नसताना दोन-दोन शिक्षक घडविण्यापर्यंतच्या तात्यांचा जीवन प्रवास थक्क करणारा, कष्ट अधोरेखित करणारा, परिस्थितीचा बाऊ न करणारा, प्रेरणादायी,उत्तेजन देणारा, स्फूर्ती देणारा, कष्टातून यश कसे खेचून आणण्याचा आणायचे हे दाखवणारा युगप्रवर्तकाचाच आहे.

स्वतःच्या तरुणपणी केलेल्या अनेक गोष्टी सांगताना भारावून जाणारे, त्यात मोट ओढणे, शेतीतील कष्टाची कामे करणे, झाडावर चढणे, रात्रीबेरात्री शेतीची कामे करणे, तसेच जीवनातील चुका स्पष्टपणे सांगणारे आणि तुम्ही अशा चुका करू नका म्हणून आवर्जून सांगणारे तरुणपणाचे बेदरकार तात्या ते आत्ताचे संयमी तात्या यांचा जीवनपट आज माझ्या डोळ्यासमोरून जात आहे.

आजच्या युगात मोठमोठ्या शहरांमध्ये मुलांना मित्र मिळवण्यासाठी क्लब सुरू झाले आहेत. मध्यंतरी एक व्हिडिओ मी पाहिला त्यात एक नातू, आजोबांना सांगत होता. माझे फेसबुकवर 50 मित्र आहेत. त्यावेळी आजोबा नातवाला म्हणतात, बाळा 50 मित्र असण्यापेक्षा एक मित्र असावा पण तो 50 वर्षे असावा. खरंच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला तात्यांची आणि त्यांचे मित्र परीट गुरुजी यांची आठवण झाली. परीट गुरुजींचे आजाराने निधन झाले पण शेवटच्या क्षणापर्यंत तात्यांची आणि त्यांची मैत्री कायम होती. खरच मैत्री काय असते ते यातून दिसून येते आणि त्यातील मित्रत्व ही दिसून येते.

वारणा नदीकाठच्या सहकारमहर्षी स्व. तात्यासाहेब कोरे, माजी आमदार स्व. यशवंत एकनाथ स्व.आप्पा नाईक यांच्या विषयी तात्या भरभरून बोलतात. लहानपणी तात्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापन केलेल्या पत्री सरकारमधील सहकाऱ्यांना जेवण देऊ केल्याचे अभिमानाने सांगतात. त्यामुळे मला आता त्यांच्याविषयी असे म्हणावेसे वाटते की ताम्रपत्र न भेटलेला सच्च्या स्वातंत्र्यसैनिक म्हणजे आमचं तात्या!

आयुष्याचा गाडा चालवण्यासाठी अंडी व्यवसाय करणारे, कोंबड्या पाळणारे, दुभती जनावरे पाळणारे, कमी शेती उत्तम प्रकारे करून त्यातून अधिक उत्पन्न घेणारे, तात्या म्हणजे एक उद्योजक, एक कष्टाळू शेतकरी, कमी संसाधनात अधिक उत्पन्न घेऊन आर्थिक सांगड घालणारे सध्याच्या काळातील मॅनेजमेंट गुरुच आहेत.

लहानपणी आईचे निधन झाल्यामुळे आईच्या प्रेमाविना वाढलेले तात्या इतके प्रेमळ कसे असतील हा प्रश्न पाडायला लावणारे आमचं तात्या!

(गावातील सर्व लोक तात्यांना (श्री.गुलचंद तुका नांगरे) आदराने पैलवान म्हणतात म्हणून येथे पैलवान हा उल्लेख केला आहे)

  • लहानपणी आईचे निधन झाल्यामुळे आईच्या प्रेमाविना वाढलेले तात्या इतके प्रेमळ कसे असतील हा प्रश्न पाडायला लावणारे आमचं तात्या!
  • नातवाच्या लग्नात मुलीची हौस करणारे आमचं तात्या!
  • जावई (श्री.शंकरराव काटे) आजोबा झाले तरी जावयाचा अभिमान बाळगणारे आमचं तात्या!
  • स्वतःच्या मुलीप्रमाणे सुनांना (संगीता नांगरे आणि विद्या नांगरे) वागवणारे आमचं तात्या!
  • नातसुनांना (अर्चना काटे आणि ऋतुजा काटे) प्रोत्साहन देणारे आमचं तात्या!
  • कौटुंबिक कारणामुळे काही काळ गावापासून दूर राहिलेले आमचं तात्या!
  • भावकीतील लोकांसाठी इतरांशी चार हात करण्यासाठी तयार असणारे आमचं तात्या!
  • मुलाला कोणता आजार झाला आहे हे मुलाला भेटायला येणाऱ्या व्यक्ती वरून ओळखणारे आमचं तात्या!
  • सर्व नातवांच्या प्रगतीने हारखुन जाणारे आमचं तात्या!
  • स्वतःच्या पत्नीवर नितांत प्रेम करणारे आमचं तात्या!
  • स्वतःच्या दोन्ही मुलांचा अभिमान बाळगणारे आमचं तात्या!
  • स्वतःचे सर्वस्व देऊन कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा न ठेवणारे आमचं तात्या!

एक उत्तम व्यक्ती, पणजोबा, आजोबा, वडील, सासरे, भाऊ, पती आणि मित्र अशा सर्व प्रकारच्या आखाड्यात आमचं तात्या एक यशस्वी पैलवान आहेत असेच म्हणावे लागेल. कारण ते या सर्व आखाड्यात भरपूर आनंदाने जगले आहेत आणि जगत आहेत. म्हणूनच एवढे सर्व आखाडे यशस्वीपणे गाजवणारा पैलवान हा हिंदकेसरीच असू शकतो.